*इटालियन भौतिकशास्त्रज्ञ, बिनतारी संदेशवहन आणि रेडिओच्या शोधाचे जनक : 'गुग्लीएल्मो मार्कोनी'.*
25 एप्रिल 1874.
20 जुलै 1937.
*बिनतारी तारायंत्रविद्येच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल मार्कोनी यांना कार्ल फेडिंनांट ब्राउन यांच्या समवेत १९०९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. इतर शास्त्रज्ञांनी विशद केलेल्या विद्युत् चुंबकत्वासंबंधीच्या तत्त्वांचा उपयोग अवकाशातून संदेश प्रेषण करण्यासाठी मार्कोनी यांनी केला, तसेच एकाच वेळी अनेक ग्राही स्थानकांशी बिनतारी विद्युत् संदेशवहन साधण्याची व्यावहारिक शक्यता उपयोगातही आणली.*
मार्कोनी यांचा जन्म बोलोन्या येथे झाला.बोलोन्या व फ्लॉरेन्स येथे खाजगी रीत्या शिक्षण घेतल्यावर ते लेगहॉर्न येथील तांत्रिक शाळेत शिक्षणासाठी गेले. विद्यार्थिदशेतच त्यांना भौतिकीय व विद्युत् शास्त्रांची गोडी लागली. त्यांनी जेम्स क्लार्क मॅक्सवेल, हाइन्रिख हर्ट्झ, सर ऑलिव्हर लॉज व इतरांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केला. १८९४ मध्ये त्यांनी बोलोन्यानजीकच्या आपल्या वडिलांच्या इस्टेटीवर बिनतारी संदेशवहनासंबंधी प्रयोग करण्यास प्रारंभ केला. त्याकरिता त्यांनी उपयोगात आणलेल्या उपकरणसंचात विद्युत् दाब वाढविण्यासाठी प्रवर्तन वेटोळे, प्रेषण स्थानी मॉर्स चावीने [ तारायंत्रविद्या] नियंत्रित होणारा ठिणगी विसर्जक व ग्राही स्थानी रेडिओ तरंगांच्या अभिज्ञानासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) एक संवाहक चूर्णयुक्त नलिका अशा ओबडधोबड स्वरूपाच्या उपकरणांचा समावेश होता. अल्प अंतरासाठी प्राथमिक प्रयोग केल्यानंतर त्यांनी अभिज्ञातक नलिकेत सुधारणा केली आणि मग एका खांबावर वरच्या टोकाला एक धातूची पट्टी वा दंडगोल व त्याला तारेने जोडलेली तशाच प्रकारची पट्टी खांबाच्या तळाला बसवून तयार होणाऱ्या उभ्या आकाशकाचा (एरियलचा) उपयोग केल्याने संदेशवहनाचा पल्ला वाढतो, असे त्यांनी पद्धतशीर चाचण्या घेऊन सिद्ध केले. अशा प्रकारे संदेशवहनाचा पल्ला सु. २·५ किमी. इतका वाढविण्यात त्यांना यश मिळाले. याच काळात प्रारित (तरंगरूपी) विद्युत् ऊर्जा सर्व दिशांनी पसरण्याऐवजी शलाकेच्या स्वरूपात केंद्रित करण्याच्या दृष्टीने त्यांनी आकाशकाभोवती परावर्तक वापरण्यासंबंधीही प्रयोग केले.
आपले प्रयोग पुढे चालू ठेवण्यास त्यांना इटलीत फारसे प्रोत्साहन न मिळाल्याने १८९६ मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथे टपाल खात्याचे मुख्य अभियंते विल्यम प्रीस यांच्याशी मार्कोनी यांची ओळख झाली आणि त्याच वर्षी जून महिन्यात बिनतारी तारायंत्रविद्येच्या एका प्रणालीचे त्यांना जगातील पहिले एकस्व (पेटंट) मिळाले. त्या व पुढील वर्षी त्यांनी आपल्या प्रणालीची अनेक यशस्वी प्रात्यक्षिके करून दाखवली आणि त्यांतील काहींत त्यांनी आकाशकाकरिता अधिक उंची मिळविण्यासाठी फुग्याचा (बलून्सचा) व पतंगांचा उपयोग केला. सॉल्झबरी मैदानावर सु. ६·५. किमी. व ब्रिस्टल खाडीपार सु. १४·५ किमी. अंतरावर संदेश पाठविण्यात त्यांना यश मिळाले. मार्कोनी यांच्या चाचण्या व त्यांवरील प्रीस यांची व्याख्याने यांना इंग्लंडमध्ये व परदेशातही खूप प्रसिद्धी मिळाली. जून १८९७ मध्ये मार्कोनी यांनी इटालियन सरकारला ला स्पेत्स्या येथे जमिनीवर प्रेषण स्थानक उभारून सु. १९ किमी. अंतरावरील इटालियन युद्धनौकांना बिनतारी संदेश पाठविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तथापि या संदेशवहन पद्धतीच्या व्यावहारिक उपयुक्ततेबद्दल बरीच साशंकता व्यक्त करण्यात आली आणि त्यात आर्थिक गुंतवणूक करण्याची उत्कंठा कोणी दाखवली नाही. तरीही मार्कोनी यांचे मावस बंधू व अभियंते जेम्सन डेव्हिस यांनी त्यांच्या एकस्वाला भांडवल पुरविले आणि त्यांच्या मदतीने वायरलेस टेलिग्राफ अँड सिग्नल कंपनी लि. जुलै १८९७ मध्ये स्थापन झाली. या कंपनीचे पुढे १९०० मध्ये मार्कोनीज वायरलेस टेलिग्राफ कंपनी लि. असे नामांतर करण्यात आले. पहिली काही वर्षे कंपनीने प्रामुख्याने रेडिओ तारायंत्राची उपयुक्तता लोकांच्या निदर्शनास आणण्याचे प्रयत्न केले. १८९९ मध्ये मार्कोनी यांनी फ्रान्स व इंग्लंड यांत इंग्लिश खाडीपार सु. ५० किमी. अंतरावर बिनतारी संदेशवहन प्रस्थापित केले. त्याच वर्षी ब्रिटिश युद्धनौकांनी सु. १२० किमी. अंतरावरून बिनतारी संदेशांची देवाणघेवाण केली.
सप्टेंबर १८९९ मध्ये मार्कोनी यांनी अमेरिकन चषकाच्या नौकाशर्यतीच्या प्रगतीची वार्ता न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांना कळविण्यासाठी दोन अमेरिकन जहाजांवर बिनतारी सामग्री बसविली. या प्रात्यक्षिकाच्या यशामुळे जगात सर्वत्र खळबळ उडाली आणि यातूनच अमेरिकन मार्कोनी कंपनीची स्थापना झाली. पुढील वर्षी जमिनीवरील स्थानके व जहाजे यांत बिनतारी तारायंत्र सामग्री बसविण्यासाठी व ती उपयोगात आणणारी सेवा पुरविण्यासाठी मार्कोनी यांनी बिनतारी तारायंत्रविद्येच्या उपकरणसंचातील सुधारणेसंबंधीचे आपले सुप्रसिद्ध एकस्व मिळविले.
>>Click here to continue<<